श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. नागपंचमी, श्रावणी शुक्रवार, मंगळागौर, दहीहंडी असे विविध रंगी आणि विविध परंपरांनी युक्त सण श्रावणात साजरे केले जातात. या सणांच्या दिवशीकेल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांचा, पूजेचा अविभाज्य भाग म्हणून नारळाचा वापर केला जातो. नारळी पौर्णिमेदिवशीही वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात आणि नारळापासून बनवलेल्या गोड पदार्थांचे सेवन करतात.
आयुर्वेदामध्ये नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष मानले आहे कारण या झाडाच्या सर्वांगाचा उपयोग विविध प्रकारे केला जातो. श्रीफळ आणि कल्पवृक्ष ही नारळाची प्रमुख दोन नावे आहेत. नारळ, या सर्वाधिक टिकणाऱ्या फळाचे अनेक उपयोग आयुर्वेदात सांगितलेले आहेत. चरक संहितेमध्ये फलवर्गामध्ये नारळाचे उपयोग सांगितलेले आहेत. त्याचबरोबर अपक्व नारळ (शहाळ), मलई, ओले खोबरे, सुके खोबरे, नारळाचे पाणी, खोबरेल तेल याचेही गुणधर्म आयुर्वेदात सांगितलेले आहेत. चला तर मग, शुभकार्यासाठी वापरला जाणारा नारळ ते सणावारातील पदार्थांचा अविभाज्य घटक असलेला नारळ याचे आयुर्वेदानुसार गुणधर्म बघू.
भारतामधील प्रत्येक राज्यामध्ये विविध पदार्थांसाठी नारळाचा -खोबऱ्याचा वापर केला जातो. नारळाच्या उपलब्धीप्रमाणे काही प्रांतात ओले तर काही प्रांतात सुके खोबरे वापरले जाते. मोदकासारखे गोड पदार्थ असो किंवा मिसळीसारखे झणझणीत तिखट पदार्थ, यात खोबऱ्याचा वापर अविभाज्य ठरतो. सणाच्या दिवशी महाराष्ट्रात केले जाणारे उकडीचे मोदक, नारळी पौर्णिमेचा नारळी भात, साउथ इंडियन कोकोनट राईस, नारळाची बर्फी या मिश्रणात नारळाचा प्रामुख्याने वापर होतोच पण याशिवाय नारळाची चटणी, खोबऱ्याचं वाटण याशिवाय अनेक तिखट रेसिपीही खोबऱ्याशिवाय अपूर्णच राहतात. पोहे, उपीट,बटाट्याची भाजी आणि अनेक पदार्थांवर खोबरे ड्रेसिंगसाठी वापरले जाते. खोबऱ्याच्या या बहुआयामी वापराचा विचार केल्यास नक्कीच त्याचे पोटाशी आणि आरोग्याशी जोडलेले नाते लक्षात येते. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून याचे गुणधर्म जाणून घेतल्यास नारळ या आहारीय द्रव्याचा वापर आरोग्याचे संतुलन उत्तम राखण्यासाठी करता येईल.
नारळ हे मधुर रसाचे, मधुर विपाकाचे आणि शीत वीर्याचे फळ आहे. ते स्निग्ध गुणाचे असले तरीही पचण्यास हलके आहे. नारळाचे पाणी हे उत्तम इलेक्ट्रोलाईट आहे. त्यामुळे आबाल वृद्धांसाठी खोबरे, नारळाचे पाणी हे बल्य,पोषक सांगितलेले आहे.
श्रावण महिना हा सणांचा राजा म्हणून ओळखला जातो पण वर्षा ऋतूत येणाऱ्या या महिन्यात अग्नि कमकुवत व पचनशक्ती मंदावलेली असते.आयुर्वेदानुसार हा वाताच्या प्रकोपाचा काळ आणि पित्ताच्या संचयाचा काळ असतो. अशावेळी पुरणपोळी, दुधाच्या गोड व पचायला जड पदार्थांपेक्षा खोबऱ्यापासून बनवलेले गोड पदार्थ आरोग्यासाठी उत्तम ठरताना दिसतात. नारळापासून बनलेले हे गोड पदार्थ शरीरातील वात कमी करतातच पण पित्ताचा संचय ही होऊ देत नाहीत. पचायला हलके असल्यामुळे अग्नि संतुलित ठेवतात. त्यामुळे अशा गोड पदार्थांचा पोटाला त्रास होत नाही.
तिखट, मसालेदार पदार्थात वापरले जाणारे खोबरे हे त्यातील उष्ण, तीक्ष्ण गुणांना कमी करून शरीरातील पित्त वाढू देत नाही. पोहे,बटाट्याच्या भाजीत वरून घातलेले खोबरेही जड पदार्थांचे पचनसुलभ करते. ओल्या खोबऱ्याच्या तुलनेत सुक्या खोबऱ्यातील स्निग्धता कमी असते पण वातपित्ताचे नियमन याद्वारे सांभाळले जातेच.
वर्षा ऋतूतील या सणांच्या काळात पोटांच्या अनेक तक्रारी अचानक उद्भवलेल्या दिसतात. अपचन,भूक मंदावणे, पोटात आग पडणे,अम्लपित्त, डोकेदुखी,चक्कर येणे याशिवाय कॉलरा, गॅस्ट्रोसारखे साथीचे आजारही या काळात बळवलेले असतात. नारळ पाणी किंवा जेवणातील खोबऱ्याच्या नियमित वापरामुळे वरील अनेक तक्रारींना दूर ठेवता येते. अनेक विटामिन्स आणि मिनरल्स यांनी परिपूर्ण असणारे खोबरे व त्याचे पदार्थ लहान मुलांमध्ये वजन वाढीसाठीही उपयुक्त ठरताना दिसतात. गर्भिणींसाठी,वृद्धांसाठी, दीर्घकालीन आजारानंतर नारळापासून बनलेले पदार्थ हे टॉनिक सारखे काम करताना दिसतात. यात अळीव खोबऱ्याचे लाडू, नारळाची वडी, खोबऱ्याची चिक्की, कोहळा नारळवडी यांचा समावेश होतो.
सणवार, ओटी, शुभ कार्यक्रम अशा प्रत्येक ठिकाणी नारळाचा वापर होताना दिसतो कारण नारळ हे फळ शुभसूचक आणि सर्जनशक्तीचेही प्रतीक मानले जाते. सणानुसार हिंदू संस्कृतीत सांगितलेल्या सांगितलेल्या परंपरा व प्रथा या वेगळ्या, वैशिष्ट्यपूर्ण आणि आरोग्यदायी ठरणाऱ्या आहेत. निसर्ग देवतेचे पूजन आणि त्याप्रती कृतज्ञता व उत्तम आरोग्याचेजतन या पैलूंचा विचार सण साजरा करताना केला गेला पाहिजे.
सणाच्या निमित्ताने सांगितलेली एखादी पाककृती व त्यातील प्रमुख घटक हा त्या सणापुरता मर्यादित नसून त्या काळातील ऋतुचर्येचा भाग म्हणून स्वीकारला पाहिजे. अशा पद्धतीने आहारामध्ये बदल केल्यास ऋतूबदलामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांपासून सहजरित्या बचाव केला जाऊ शकतो. नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने प्रामुख्याने नारळापासून केले जाणारे मिष्टान्नसेवन जसे करंज्या, नारळी भात यामुळे शरीरांतर्गत दोषाचे नियमन आणि संतुलन राखले जाते. यामागचा आरोग्यदायी उद्देश समजून घेतला व आहारात असा बदल केला तर नक्कीच आपले आरोग्य उत्तम राहू शकते.तुम्ही सुद्धा या बहुआयामी, बहुगुणी नारळाचा वापर जरूर तुमच्यास्वयंपाकात करा.
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Author:
Dr. Gayatri Kulkarni – Mulye (MD Ayurved),
Vaidya Tejaswini Sameer Bhale (Ayurvedacharya, Nadi Pariksha Expertise)